माझं कोल्हापूर
माझं कोल्हापूर
गोष्ट माझ्या शहराची
आहे खूपच न्यारी
आम्ही कोल्हापुरी
आहोत लय भारी........!
ताई, माई ,अक्का
दादा, मामा, भाऊ
म्हणतात, नकोस तू भिऊ
अडचणीला सारेच धावू....!
अतिथी येथे देवो भव!
नाही पडत काही कमी
स्वारी ला खुश करण्याकामी
चविष्ट खाण्याची नक्की हमी.....!
तांबडा पांढरा रस्सा खास
झणझणीत कोल्हापूरी मिसळीची बात
गुळाची ढेप गोडीला खात
प्रेमाने अडचणीवर करतात मात........!
शाहूंच्या या अफाट नगरात
अस्सल कुस्तीचा मांडतात डाव
रांगडा मर्दानी मैदानात नाव
खासबागच्या मातीत कोल्हापूरचा भाव...!
नारीच्या नखय्राला
शोभतो कोल्हापुरी साज
कोल्हापुरी चप्पलांचा अलग अंदाज
नऊवारीतील लावणी ठसकेबाज.......!
भक्तीभावाचा ठेवा अपार
आई महालक्ष्मीची कृपा अफाट
पन्हाळ्यावर ज्योतिबा विराजमान विराट
शिवाजी महाराजांचा गडावर थाट....!
कोल्हापूरचा घाट हिरवागार
सृष्टी सौंदर्याची आहे येथे खाण
रंकाळा तलावाची वेगळीच शान
हरपतो पर्यटक आपले भान........!
विविध गोष्टीत अग्रेसर
शिवाजी विद्यापीठ
ज्ञानाचे ज्ञानपीठ
राजकारणाच निर्विवाद व्यासपीठ
शाहिरांच अस्सल लोकपीठ...........!
पण आता,वाढतयं माझं कोल्हापूर
गजबजतयं कोल्हापूर
घड्याळ्याच्या काट्यावर पळतयं कोल्हापूर
महापुरात वाहतयं कोल्हापूर......!
तरीही, कमी पडत नाही कोल्हापूर
सर्वांना आनंद देणार पुरेपूर
म्हणून कोल्हापूरला भेट द्या जरूर
अन् प्रेमात रंगून जा भरपूर......!
