वंशाचा दिवा
वंशाचा दिवा
लग्न झालं पोरीच नवं नवं
सार्यांना वाटू लागलं आता मूल हवं
आजोबा आजींना नातू हवा पहिला
म्हणाले नात पहिली नको आम्हाला
त्यांच्या पाई भेद करावा लागला आईला
तीही मग म्हणाली मुलगा हवा मजला
पोरा तुझीच होती सर्वांना आस
आणि त्याच आशेवर काढले नऊ मास
पाडव्याच्या मुहूर्तावर तुझा जन्म झाला
म्हणाले सर्वजण पोरगा बापावरच गेला
आनंदापाई साखर - पेढा वाटला गावाला
आणि घरादारात गुलाल उधळला
असा वंशाचा तू लखलखीत दिवा
जावून पोहोचलास कुठल्या रे गावा?
अभ्यासात तुझा खालून पहिला नंबर
व्यसनाच्या आणि तुझ्या नात्यात उरल नाही अंतर
बापानं रक्ताचं पाणी केल
काळजीनं आईला वेड लागलं
बापाची तुला वाटली नाही कदर
दिसला नाही तुला अश्रूंनं भिजलेला पदर
सर्वाना इतका दिलास तू ताप
अरे पोरा कुठे फेडशील हे पाप?
"लख्ख दिव्यापेक्षा "आई मनास म्हणती
बरी झाली असती मिणमिणती पणती
चार दिवस जरी सोबत असती
चार जन्माला पुरेशी माया देती...
