शोध तूच तुझ्या अस्तित्वाचा..
शोध तूच तुझ्या अस्तित्वाचा..
उदरात गं आईच्या
स्वप्न गोड गं तू पाहिलस
गालातल्या गालात हसूनी
बाहेरच्या दुनियेशी गुज साधलस.....!
आईच्या डोळ्यानेच गं
जग सुंदर तू न्याहाळलस
तिने सुंदरच ते दाखवलं
त्यापलीकडच गं काहीही न तुला दिसलं.....!
आईचं बोट धरूनी
पाऊल जगात तू ठेवलस
माऊलीच्या कोमल स्पर्शासव
सुंदर असाव असं जाणलस...!
पण जन्मतःच गं तू
काही बोल मग झेललस
मुलगी कशी हो झाली
मुलगा हवा होता हे ऐकलस....!
खुलता खुलता तुझी कळी
असंख्य बंधने तुझ्यावर आली
अपेक्षा तुझ्याकडून वेगळी
जगाची ही रीत तू पहिली....!
म्हणे, हसू नकोस तू मोठ्याने
की बोलू नकोस मोठ्याने
चालतानाही पाय टाक बेताने
मुलगी आहेस जपून रहा म्हणे, नेटाने...!
घराबाहेर पडलीस जरी
सुर्यास्त म्हणे पाहू नकोस
एकटीने तू घराबाहेर
पडण्याचा विचारही करू नकोस...!
दोष नजरेत आहे दुनियेच्या
पण ठेव तू स्वतः ला म्हणे झाकून
फुलपाखरासव बागड फक्त म्हणे
पण पायात बेड्या ठेवल्या टाकून.....!
खाताना, शिकताना,फिरताना, वावरताना
प्रत्येक क्षणी झेललास तू दुजाभाव
अगदी तोलामोलाने जगतांना
नाही दिसला कधीच तुला समभाव....!
पण हरली नाहीस तू
बुजली नाहीस तू
ताठ मानेने जगण्याची
धडपड सोडली नाहीस तू....!
म्हणुनच जिजाऊ बनून
संस्कारांची बाग तू फुलवलीस
सावित्री बनून
आंधळ्या समाजास तू भिडलीस....!
ताराराणी तू बनून
शत्रूला चितपट करून सोडलीस
झाशीची राणी बनून
पोराला पाठीवर घेवून पळलीस....!
मदर टेरेसा बनून तू
गरिबाची झोळी भरलीस
सिंधुताई बनून तू
पोरक्याचीही आई बनलीस.....!
इंदिरा बनून तू
देशाची धुरा सांभाळलीस
प्रतिभा बनून तू
स्वतः च्या प्रतिभेला जपलीस....!
सुधा मूर्ती बनून तू
उद्योग जगताची राणी झालीस
अरुंधती बनून तू
आर्थिक व्यवहार ही पेललीस....!
किरण बेदी बनून तू
सक्षमतेचा आदर्श झालीस
मेरी कोम बनून तू
देशाचा अभिमान ही बनलीस....!
किती सांगायची उदाहरणे
इतकी कणखर तू बनलीस
पाडून स्वतः ला पैलू
हिर्यासम तू चमकलीस.....!
अडखळलीस, पडलीस
पुन्हा सावरलीस, उभी राहिलीस
आता सहजतेने मग
पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जगलीस...!
तुझ्याविन रिती ही झोळी
आईच्या मायेची, मुलीच्या काळजीची
निर्माण होईल पोकळी
बायकोच्या प्रेमाची, बहिणीच्या आधाराची....!
म्हणुनच अभिमान आहेस तू जगाचा
स्वाभिमान आहेस तू नारी शक्तीचा
गवसलेला सूर आहेस जगण्याचा
शोध आहेस तूच तुझ्या अस्तित्वाचा
शोध आहेस तूच तुझ्या अस्तित्वाचा....!
