ऋणानुबंध
ऋणानुबंध
गतजन्माची असावी आठवण
की ऋणानुबंध या जन्मीचे
सुरास मेळ तालाचा की
सुरमय संगीत तालावरचे .....
उगाच का असे तुला सुचावे
चाकोरीबाहेर जरा जगावे
उगाच तु का घाट घालुनी
विश्व वेगळे शोधित जावे.....
तुझ्या वेगळ्या विश्वाचा या
उगाच का मी भाग बनावी
नारायणीच्याच मनी कदाचित
कारणे निमित्त मात्र ठरावी…..
उगाच भुरळ का मला पडावी
शोधक अशा या तुझ्या नजरेची
तहान तुलाही का लागावी
आस वाटुनी काव्य फुलांची.....
छंद वेचण्या काव्य फुलांचा
मकरंदाची ओढ लागावी
बासरी सम करीत गुणगुण
भ्रमराने का साद घालावी......
पाण्याने ही खोड काढुनी
उगाच मज का खेचून घ्यावे
हाती हात धरून तुझाच का
लाटांवर मग फेर धरावे......
काव्य फुलांची गुंफण बांधण्या
उगाच का तू मोट बांधावी
ध्यानीमनी नसता मजका
उगाच तुला मी साथ का द्यावी......
काव्य फुले ही ओवता ओवता
प्रेम धागा सुगंधित व्हावा
माळण्यास केसात हा सुंदर गजरा
उगाच का तू सामोरा यावा......
स्पर्श तुझा का व्हावा अलगद
अन मोहक गजरा अजून फुलावा
ओठांच्या या कळीतला मकरंद
हळूच का असा तू टिपून घ्यावा.....
प्रणय पुरेपूर निखळ निर्मळ
प्रवास मध्येच जीवघेणा ठरावा
संकटांचा ओसाड पर्वत
छाती ठोकून उभा ठाकावा.....
पर्वत सर करता करता
प्राण एकवटून तग धरावा
प्रवास समांतर या रेषांचा
प्रयत्न करूनही ना मेळ जुळावा.....
पण ओढ नसावी वरवरची ही
ओढ असावी मनामनाची
संकटावर ही मात करुनी
ज्योत तेवली निर्मळ प्रेमाची.....
आज तुझ्या माझ्या नात्याची
वाट कठीण पण तरी वेगळी
एकमेकांच्या साथी शिवाय
सुखे वाटे अपूर्ण सगळी.....
नजर न लागो कुणाची प्रेमास
एकच असे आता निव्वळ इच्छा
विधीलिखित असावी भेट आपली
म्हणूनच पाठीशी असे देवीची सदिच्छा....!!!

