उद्याचा मी अभिमान बनेन
उद्याचा मी अभिमान बनेन
अगं आई! बघ ना गं
आज मी माझे पहिले पाऊल
या जगात ठेवते आहे....
तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद तर
अगदी ओसंडून वाहत आहे...
आज तुझं बोट
मी माझ्या हातात पकडल आहे...
हेच बोट धरून
मी सारं जग पाहणार आहे...
हे कोण गं भेटायला आले ?
माझे आजी आजोबा का ?
पण आजी बघ ना !
हसतच नाही माझ्याकडे बघून
आजोबा तर दुरूनच पाहून गेले ही....
का गं? मी नाही का आवडले त्यांना?
छान गोरी पान तर दिसते मी
आणि गोड गुटगुटीत पण आहे...
आणि हे कोण? बाबा ना गं!
त्यांनी घेतलंच नाही बघ मला उचलून
त्यांनाही का ग नाही झाला
तुझ्यासारखा भरभरून आनंद.....
अगं सांग ना त्यांना
मी मोठी होऊन खूप काळजी घेईन त्यांची
त्यांचा ऑफिसचा डबा ही करून देईन...
दमून आले ना डोकं पण चेपून देईन
आजोबांनाही सांग ना
मी मस्त काठी बनून त्यांना फिरायला नेईन
आजीलाही सांग....!
सगळी औषध हातात देईन
पाय ही दाबून देईन...
तुला स्वयंपाकात मदत ही करीन
आणि खूप खूप अभ्यास करून
मोठाली अधिकारी होईन....
तुम्हा सर्वांची मी
ढाल बनून राहीन ...
तू सोबत असलीस ना
सांग कशी कुठे मी कमी पडेन?
अग आई, नको ना गं रडू
सोबत मिळून आपण
दोघी छान लढू...!
तू माझा विश्वास बन
मी तुझी ताकद बनेन
नाकारला असेल मला आज जरी
उद्याचा मी अभिमान बनेन
उद्याचा मी अभिमान बनेन...!!!
