एक दिवस तुझ्यासाठी
एक दिवस तुझ्यासाठी
आई एक दिवस माझ्याकडे
माहेरवाशीण म्हणून ये गं!
तू जशी घेतेस काळजी
तशी मलाही घेऊ दे गं....
बोलत नाहीस तू काही
जाणून आहे मी गं !
म्हणूनच म्हणते तुला
थोडा निवांतपणा हवाच ना गं ..
म्हणूनच एक दिवस माझ्याकडे
हक्काने मुलगीच बनून ये गं !
तुझ्या आईकडे जायचीस ना
तशीच माझ्याकडेही राहा गं....
सका-सकाळी पाचला नको
नऊलाच तू उठ गं..!
आयत्या मेजवानीचा कधीतरी
अस्वाद सर्वांसोबत तू घे गं...
हात नको लावू कामाला
निवांत गप्पा मारत बस गं!
टीव्हीवरच्या सिरीयल बघून
फेरफटकाही मारून ये गं...
नातवांसोबत खेळामध्ये
तुझेही मन रमव गं !
विसरून जा तु तुझं सासर
थोड स्वतःकडेही बघ गं...
एक दिवस मातृदिनाच्या
फक्त शुभेच्छा नको गं !
तुझी सेवा करण्याची
फक्त संधी दे गं...
समज तुझ्या मुलगीच घर
हे हक्काचं तुझं माहेर गं !
माहेरी जाते सांगून
गाठोडं बांधून ये गं...
खरंच, आई एक दिवस माझ्याकडे
माहेरवाशीण म्हणून ये गं !
तू जशी घेतेस काळजी
तशी मलाही घेऊ दे गं....
