रहस्यमय पेटी
रहस्यमय पेटी
एक अडगळीची खोली
त्यात निपचित पहुडलेली रहस्यमय पेटी
धुळीने भरलेली
उघडाव कुणीतरी या अपेक्षे पोटी....
एक टाकला कटाक्ष
अन् दाटून आठवण आली
काय असेल त्या पेटीत
हुरहुर होती सर्वांना लागली....
रोजच आजी जायची खोलीत
खोलीची कवाडं बंद व्हायची
काहीतरी अनमोल असेल नक्की
त्याशिवाय का पेटी आजी जपायची.. .
नक्कीच असेल अनमोल हिरे
की असतील दागदागिने
पण या विचाराने मात्र एक झाले बरे
आजीची काळजी घेतली सर्वांनी हिरीरीने ...
एक दिवस आजीला झाली देवाज्ञा
सर्वांच्या नजरा आता पेटीवर खिळल्या
क्रियाकर्म एकदाचे आटपून घेतले
स्वार्थी सर्वांच्या भावना चळल्या......
सर्वांसमक्ष उघडली गेली रहस्यमय पेटी
काय होत्या त्यात अशा अनमोल गोष्टी?
आजोबांनी आजीसाठी घेतलेली साडी
पावसाळ्यात बनवलेली कागदाची होडी.....
बाबांचा खुळखुळा अन् आत्याचा फ्रॉक
आईसाठी जपलेला अन्नपूर्णेचा टाक
एक ना अनेक जुन्या त्या आठवणी
करून ठेवली होती सुख दुःखाची साठवणी....
सोबतची माणसे स्वार्थात होती बुडाली
म्हणुनच माऊली आठवणीत होती रमली
गाठतो माणूस असा स्वार्थाचा कळस
म्हणुनच येते वागण्याची त्याच्या आता किळस....
म्हणुनच येते वागण्याची त्याच्या आता किळस.....!!!
