व्यथा तिरंग्याची
व्यथा तिरंग्याची
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही
भारत, अर्धा भुका अर्धा नंगा
मुठभरासाठीच का हे स्वातंत्र्य
फडकताना प्रश्न विचारतो तिरंगा
सत्याचा दाबला जातो आवाज
असत्याचा वाजतो सर्वत्र भोंगा
अंधभक्तीत मूक बधिर झालेल्यांना
फडकताना प्रश्न विचारतो तिरंगा
रक्त सांडविणारे झाले देशद्रोही
देशभक्त ठरले बिल्ला रंगा
इतिहासाचे किती तोडणार लचके
फडकताना प्रश्न विचारतो तिरंगा
बेईमान झाले मालामाल
इमानदारीला मिळतो ठेंगा
भ्रष्टाचाराने किती पोखरणार
फडकताना प्रश्न विचारतो तिरंगा
धर्मांधतेने गाठला कळस
सत्तेसाठी धर्म,जातीय दंगा
धर्मनिरपेक्षतेला किती गाडणार
फडकताना प्रश्न विचारतो तिरंगा
विविधतेतही एक रंग माझा
खबरदार, जर घ्याल पंगा
अशोकचक्र पुन्हा गतिमान करा
फडकताना संदेश देतो तिरंगा
