सोप असतं का कुठे....?
सोप असतं का कुठे....?
सोपं असतं का कुठे....?
मतिमंद मुलाचे मातापिता होणं ,
अचानक डोक्यावरून छत,
पायाखालून जमीनच सरकणं
सोपं असतं का कुठे...?
त्याचा स्वीकार करणं
आलेल्या नैराश्येला पुन्हा
पुन्हा आशेत बदलणं
सोपं असतं का कुठे..?
त्याच्या भावना जपणं .
लोकांच्या टोकणाऱ्या
नजरांना हसत हसत झेलणं
सोपं असतं का कुठे...?
त्याला दिव्यांगा मध्ये बदलणं
प्रत्येक क्षण, संपूर्ण आयुष्य
त्याच्या भोवती गुंडाळणं
सोपं असतं का कुठे...?
सांभाळ त्याला शिकवणं
छोट्या छोट्या प्रगतीसाठी
दिवस ,महिने. वर्ष वाट बघणं
सोप असतं का कुठे..?
त्याचे जग निर्माण करणं ,
त्याच वेळी स्वतःच्या संपूर्ण
जगाला पूर्णपणे विसरणं
सोप असतं का कुठे..?
पुढे काय? काळजी करणं,
दिवस-रात्र जिवंतपणी
स्वतःला रोज रोज मारणं
सोप असतं का कुठे..?
त्याला स्थान मिळवून देणं ,
दयाभाव पेक्षा संधी, हक्क,
समान अधिकार मिळवून देणं
सोप असतं का कुठे....?
ध्रुव तारा निर्माण करणं
दिव्यच पार करणं,दिशाहीन
होवून नवी दिशा निर्माण करणं
