STORYMIRROR

Sangeeta GodboleJoshi

Abstract Romance

4  

Sangeeta GodboleJoshi

Abstract Romance

माझिया मना..

माझिया मना..

2 mins
479

सैरावैरा धावणाऱ्या मनाच्या कमरेला 

तिनं घट्ट मिठी मारुन म्हटलं ..

इतकी धावायची ..


खरंच गरज असते का?

असं भांबावल्यासारखं ..

बिथरल्यासारखं ..

सैराट धावणं ..

सोड की आता ..


कधीतरी..कुठल्यातरी 

थांब्यावर ..

क्षणभर तरी घे विसावा ..


खळखळून हसलं मन ..

कितीतरी दिवसांनी ..

म्हणालं ..

'हे'असं ..तू मला सांगतेस?

नं दिसणाऱ्या भिंगऱ्या 

पायाला लावून धावत असतेस ..

तेव्हा ..

हा असा विचार ..

तू का नाही गं करत ?


अविश्वासानं त्याच्याकडं 

अचंबित होऊन पहाताना ..

स्वतःशीच म्हणाली ती ...

म्हणजे इतका विचार करण्याची फुरसत

अजूनही आहे वाटतं तुझ्यापाशी ..


अगदीच काही वेळ गेली नाहीये म्हणजे ..

मलाही या रहाटगाडग्यातून 

स्वतःसाठी काही क्षण राखून ठेवायला ..जमतील वाटतं ..


अगं ..वेळ अशी जात नसते ..

आपण तिला जाऊ देतो ..

नी मग हळहळत रहातो ..

ती निघून गेल्याची खंत करत ..

रुणझुणत्या पावलानं येणाऱ्या ..

नव्या पहाटेचं स्वागत ..

तिच्या पायात व्यवहाराचे

साखळदंड घालून ..


जायबंदी करतो तिला ..

कधीतरी ..क्वचित ..

झालीच इच्छा तिच्या स्वागताची ..

तर घालून बघ नं घुंगुरवाळे चाळे ..

कधीतरी घाल ..कोयरीच्या नक्षीचे ..घुंगरु लावलेले ..

सुबकसे पैंजण ..

कधीतरी होते नं तेही ओळखीचे ?

सारं विसरायलाच झालंय रे आता ..


पण ..

थोडंसं सैलावल्यासारखं वाटतंय ..

स्वतःसाठी जगावं वाटतंय ..

'स्वतःपुरतं ' नाही म्हणत मी .

मला नाहीच जमणार तसं ..


पण ..

तुझ्याशी या संवादानं मोकळं वाटलं ..

मुळात ..

कुणाशीतरी संवाद असायला हवा ..

मुख्यत्वानं ..

स्वतःशी ..

मन आणि मी ..असं वेगळं वेगळं करुन ..


एकदातरी बोलायला हवं ..

खरंय रे ..

पटतय तुझं ..

अगदी ..

तुझ्यापासून ..

म्हणजे ..

मनापासून रे ..


आता तुझ्या कमरेची मिठी ..

सोडली ना ..

तरी तू मला सोडून ..

धावणार नाहीस ..

सैरावैरा ..


मला कारण उमजलंय ..

तुझ्या अशा धावण्याचं ..

तुझ्यातल्या माझ्यातल्या .. संवादाचा अभाव ..

मग ..धावणारच ना तूही ..

सैरावैरा ..

भांबावून ..


कितीतरी नाती ..

अशी भांबावलेलीच असतात वाटतं ..

एखाद्या वळणावर ..

थोडं थांबावं ..

कुणासाठीतरी ..

चार क्षण तरी संवाद साधावा ..

मग हे असं सैरावैरा धावणं ..

थांबेल ..

नात्यांच्या घट्ट विणीनं ..

स्थिरावेल मन ..

थोडंसं तरी का होईना ..


आयुष्यात ..

हेच जास्त गरजेचं असतं ..

नाही का?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract