संधीकाल...
संधीकाल...
सांजवेळीच्या आभाळावर भिरभिर झाली थोडी
झुलू लागली वाऱ्यासंगे रानपाखरे वेडी
निळे गुलाबी केशर पिवळे रंग उधळिले गगनी
शालू नेसून गवतफुलांचा नटली हिरवी अवनी
प्रीतीच्या रंगात रंगली गगन-धरेची जोडी
झुलू लागली वाऱ्यासंगे रानपाखरे वेडी
मावळतीच्या रविकिरणांना हळू बिलगता वेली
शुभ्र धवल पाकळ्या फुलांच्या हसू लागल्या गाली
मुक्या कळ्यांचे अधर चुंबितो भ्रमर काढितो खोडी
झुलू लागली वाऱ्यासंगे रानपाखरे वेडी
सांजसावल्या दुरावताना व्याकुळलेली राने
नवथर अल्लड रजनीओठी मंजुळ सुभग तराणे
त्या गीतांच्या सुरासुरांना अमीट अमृतगोडी
हिंदोळ्यावर झुलू लागली रानपाखरे वेडी