मनी श्रावणाच्या ..
मनी श्रावणाच्या ..
मनी श्रावणाच्या झाला सारा गोंधळ सावळा
माझा तुझा गं श्रावण कसा वेगळा वेगळा
उंच उंच नभी जाई माझ्या श्रावणाचा झोका
तुझ्या श्रावणाच्या ओठी सदा आठवांच्या हाका
माझ्या श्रावणाला बाई गर्द पाचूची किनार
तुझा श्रावण हिरवा त्याला ओलेती झालर
माझ्या श्रावण श्वासात गंध सुगंध फुलांचे
तुझ्या श्रावणाच्या उरी चित्र ऊन पावसाचे
सात रंगाचे धनुष्य माझ्या श्रावण डोळ्यात
तुझा श्रावण रंगतो सदा सावळ्या घनात
तुझ्या माझ्या श्रावणाची भेट घडो एकवार
तुझ्या श्रावण मनीचे स्वप्न होईल साकार
माझ्या श्रावणाच्या पोटी सदा सुखाच्याच लाटा
सजवेल शृंगारेल तुझ्या सजणाच्या वाटा
घन सुखाचा सुखाचा तुझ्या दारी बरसेल
तुझा माझा गं श्रावण कसा वेगळा राहिल
तुझ्या माझ्या श्रावणाचे बाह्यरुप जरी भिन्न
अंतरंग भिजवितो सखे एकच श्रावण