आळवण
आळवण
वाट बघता-बघता
आले नयन भरून
जीवा लागलीया आेढ
तुझे कधी ते दर्शन
रोमारोमात रे माझ्या
सदा तुझेच गायन
विठ्ठल-विठ्ठल नादाने
नाचे धरती गगन
झळं इंगळाची शमते
होता तुझे स्मरण
बळ मिळते झुंझाया
नाम तुझे रे पावन
एक आस मनी माझ्या
घ्यावी भेट कडाडून
पाया लागुनिया तुझ्या
जावे भान हरपून
माया जंजाळ संसार
सदा भुलविते मन
क्षणभराचा आनंद
पुन्हा जनम मरण
नको बार बार जनम
नको बार बार मरण
थकलो रे येरझाऱ्याने
घे पदरात सामावून