वेळ... थांबत नाही!
वेळ... थांबत नाही!
वेळ कोणास थांबत नाही, हाती कसा लागावा
मनातील आठवणींचा, माग कसा काढावा
वेळ काळोखी गुहा, वेळ प्रकाशाचे घर
वेळ शत्रूचेही रुप, वेळ दोस्तीचे माहेर
आळसावलेली ओंजळ माझी, त्यात कसा धरावा
वेळ कोणास थांबत नाही, हाती कसा लागावा
वेळ नभांचे आकाश, जलाने भरलेलं
वेळ अवकाशीचे स्वप्न, चांदण्यांनी बहरलेलं
वेळ भिरभिरते चक्र, अर्थ कसा लागावा
वेळ कोणास थांबत नाही, हाती कसा लागावा
रुप-स्वरूप त्याचे, कुणास उमगले नाही
वेळ अंतहीन सागर, त्यापरि आणिक नाही
या अनोळखी विश्वाचा, कसा आधार मागावा
वेळ कोणास थांबत नाही, हाती कसा लागावा
मनातील आठवणींचा, माग कसा काढावा