सलिल श्यामल
सलिल श्यामल
क्षिति विरह व्याकुळ
जशी राधा वृंदावनी
अब्द दुरूनच पाही
हरी श्यामल बनूनी
उर्वी तप्त तहानली
जणू राधिकेची तृष्णा
मेघ नाही बरसला
स्तब्ध गोकुळात कृष्णा
मही आवाहन करी
आर्त पुकारा प्रेमाचा
परि सलिल कठोर
गुण निर्दयी श्यामाचा
भूमि कवेत तोयाच्या
राधा मोहनाची मिठी
नीर निरद प्रसवी
श्याम वाहे नदीकाठी
धरे पर्जन्याची ओढ
वेड राधेला भक्तीचे
पय जीवनाचे रुप
कृष्ण स्वरुप तृप्तीचे