संघर्षाच्या जगण्याची
संघर्षाच्या जगण्याची

1 min

11.7K
एका अंधारल्या राती
चूल विझायला आली
झोप उपाशी पोरांची
अन्न शोधण्या धावली
तिची फुटकी कांकणं
थरथरती वाजली
थंड रित्या तव्यालाही
आली उदास काजळी
हातावरच्या पोटांचे
पाय गावाला वळले
पाठीवरच्या जगाने
अश्रू वाटेत ढाळले
तापलेल्या धरतीने
अर्ध्यातच दंश केला
कष्टकरी गोतावळा
मातीचाच अंश झाला
संघर्षाच्या जगण्याची
भ्रांतच सारी मिटली
जित्या अंगणाची माती
मरणाअंती भेटली