मायेचा पदर
मायेचा पदर
तुझ्या पदराची छाया
माझ्या डोईवर माते
मनी चैतन्याचे बीज
तुझ्या कृपेने रूजते ॥1॥
तुझ्या अंगाईचे गीत
भूल दु:खाची पाडते
तुझा निर्मळ पान्हा
अमृतास लाजवते ॥ 2॥
तुझे मायेने गोंजारने
ममतेची साक्ष देते
तुझ्या आठवणी साऱ्या
भेट विठूरायाची घडवते ॥ 3॥
आई तुझ्या चरणावरी
माझे मस्तक ठेवते
तुझ्या पदराच्या आड
सारे विश्व सामावते ॥ 4॥
