माझी शालामाता
माझी शालामाता
पवित्र माझी शालामाता
अहिल्यादेवी नाव असे
घराजवळच शाळा
पायी पायी जात असे
गरमगरम डबा
नऊ वाजता येतसे
पाहताच दुरुनही
हर्ष मजला होतसे
खोखो लंगडी कबड्डी
रिंग थ्रोबाँल खेळांनी
मजा खास बालपणी
आज येती आठवणी
अभ्यासाची चढाओढ
बक्षिसांची रस्सीखेच
स्पर्धा जीवघेणी नसे
सर्व खिलाडूवृत्तीनेच
शिस्त कडक शाळेची
स्तब्ध शांतता वर्गात
कविता लेख नि गोष्टी
ठसल्या मनामनात
सुविचार फळ्यावरी
वाचण्याची ओढ असे
नकळत संस्कारांची
बीजे रुजली मनामधे
सोडताना शालामाता
अश्रू दाटले नयनात
हात हाती घेऊनिया
जड अंतःकरणात
पंख मयूरी मनाला
शैशवात फुटलेले
मन भारावून गेले
गेले ते दिन गेले