माझे असेच आहे
माझे असेच आहे
आयुष्य आज ही, माझे कोरडेच आहे
परतून ये प्रिये मी, होतो तिथेच आहे
काटे उरात माझ्या, सलतात काय सांगू
आहे गुलाब मी अन, माझे असेच आहे
या दोन लोचनांच्या, रोखून आसवांना
आता पुढे तुझ्याशी, हसणे बळेच आहे
हृदयास भावणारी, ही प्रीत ना बरी हो
समजावले कितीदा, मन हे खुळेच आहे
वाटे तुला पहावे, आता अखेर वेळी
हे मागणे मनाचे, तुजला जुनेच आहे
प्रेता नकोत माझ्या, सत्कार पुष्पमाला
देशील एक आसू, ते ही पुरेच आहे