लुटुया अभिनव वाण
लुटुया अभिनव वाण
वाण देती सुवासिनी
मकर संक्रमणास
दान द्यावे गरजूंसी
योजुनिया पर्वणीस (१)
वाण द्यावे नवे - जुने
परंपरा कालमाने
गरजेला जाणुनिया
दान सत्पात्री करावे (२)
वस्त्र, शिधा, पांघरुण
अशा अनेक गरजा
देता क्षणी मुखी त्यांच्या
उमटेल स्मितरेषा (३)
एकमेकां साह्य करु
मंत्र आचरणी यावा
बंधू भगिनींना नित्य
हात मदतीचा द्यावा (४)
सामाजिक कर्तव्याचे
पालन सारेच करु
देश आपुला प्रगत
कीर्ती जगात गाजवू (५)
