लठ्ठोबा अळी
लठ्ठोबा अळी
एका झाडावरती,
रहात होती अळी,
थोडी थोडी हावरी,
थोडी वेंधळी.
भूक भूक करत,
सारखी पानं खायची,
किती खाल्लं तरी,
भुकेलीच रहायची.
सारख सारख खाऊन,
अळी झाली लठ्ठ,
नवे कपडे सारे,
होऊ लागले घट्ट.
हसायला लागले सारे,
लाज लागली वाटू,
अश्या या रूपाची,
खंत मनी दाटू.
वाईट वाटून तिला,
कोष विणू लागली,
स्वतः लपवाया,
कोशात जाऊन लपली.
कोशामध्ये जाता,
झोप तिला आली,
बघता बघता अळी,
गाढ झोपी गेली.
जाग येता क्षणी,
हलकं हलकं वाटल,
तीच स्वतः आहे,
तिलाच नाही पटलं.
गिरकी घेत स्वतःला,
आरशामध्ये पाहिलं,
रंगीत रंगीत सुंदर,
फुलपाखरू दिसलं.
दिवस कधी बदलती,
कळे नाही काही,
कुरूपता कधीच,
तशी रहात नाही.
कुरूप या जगामध्ये,
काहीच नाही,
व्यंगावरून कोणा,
कधी हिणवायचे नाही.
