लहानपण देगा देवा
लहानपण देगा देवा
आठवणींचे मोहोळ उठले,
मन सैरभैर होऊनी गेले..
निर्मळ ते बालपण,
आनंदाचे डोही मनी उठे तरंग.
बालपणीचे जिवलग सोबती,
नाही तोड कशाच त्यांसी,
निःस्वार्थ मैत्रीचे बीज रोवले मनी.
सवंगडयांसंगे केली दंगा-मस्ती,
शिक्षेतही भागीदार सारखे,
मौजमजेचे दिवस होते,
गंध स्मृतींचा मधुर दरवळे.
निष्पाप आमुची मने कोवळी,
नव्हते अपेक्षांचे ओझे,
म्हणूनि सुकर होते आमुचे बालपण.
जबाबदारीचे वाहिता ओझे,
गेले सरूनि रम्य ते बालपण,
कालानुरूप बदलली जीवनशैली,
वाढले ओझे अपेक्षांचे,
आणि थकला जीव पुरता गुदमरूनी.
हवेहवेसे जरी बालपण,
निसटूनि गेले क्षण ते आता,
पुनः उजळवूया स्मृति निरंतर.
नसे मर्यादा वयांस कोणती,
अल्लड मनास नको गवसणी.
चिरतरूण राहू दे मन हे आपुले,
अनुभवू या पुनःश्च रम्य ते बालपण!
