सारीपाट
सारीपाट
मंगल सूर सनईचौघड्याचे,
मनमोहक जादूई दिवस मंतरलेले,
सुरू झाले नवीन पर्व आयुष्याचे.
बहरला गुलाब अंगणी सुगंधित,
संसाराच्या वेलीवरती
उगवली कळी गोजिरी एक.
आयुष्याला लाभला नवीन अर्थ.
दिवसा मागून दिवस सरले,
करूनी रंगांची मुक्त उधळण.
भूतकाळ-वर्तमानाचे समीकरण,
दावतो प्रश्न मनीचे अजाणतेपण.
भेटले हितचिंतक अनेक मार्गातीत,
काही राहिले सदा स्मरणातीत,
काही विरूनि गेले विस्मृतीच्या डोहात.
सुख-दुःखाच्या लाटेवरती डोलली संसाराची नौका,
परी पैलतरी लागली आयुष्याची नौका.
संघर्ष नाही चुकला कोणासी,
नागमोडी वळणांचा मार्ग सुकर होऊनी,
संसाराचा रथ लागला मार्गासी,
आणि
फळे रसाळ गोमटी चाखली संसाराची.
