सत्पात्री दान
सत्पात्री दान
आयुष्य अपुले क्षणभंगुर,
उसंत घेऊया पळभर
भाग्यवान असू भूलोकीचे,
आस्वाद घेतसी रंगधनुचे
स्मरण ठेवूया निष्पाप जीवांचे,
बेरंगी आयुष्य तयांचे
अन् काळोख तयांचा सखा सोबती
अनिश्चित हे जीवन आपुले,
पण अटळ आहे अंत निश्चित
जीवन-मृत्यु मध्ये असती
फक्त श्वासाचे अंतर
कवडीमोल ही संपत्ती सारी,
मौल्यवान हे शरीर आपुले
जीवनदान देऊया लाभार्थ्यासी
करूनी अवयव दान !
उचलूनी वाटा खारीचा,
भागीदार होऊ सत्कर्माचा
ह्दय, फुफ्फुसे, त्वचा ,
यकृत ,नेत्र आणि किडनी
अवयव आपुले दान करूया !
देह सोडूनी गेलो जरी ही,
परी अवयवरूपी राहू जिवंत इतरांच्या देही
सर्वश्रेष्ठ दान हे सत्पात्री,
गरज आहे जनजागृतीची,
मशाल पेटवू क्रांतीची
