लग्न ताईचे
लग्न ताईचे
पाहुणे आले जेंव्हा पाहायला ताईला
सगळीच तारांबळ वेळ पुरेना आईला
बाबांची उठबस,मान पानात वेळ गेला
पाहुणे येऊन गेले, तसा दिवसही संपला
जाताना पाहुणे कळवतो सांगून गेले
ताई - दाजी एकमेकांचे झाले चेहऱ्यावर कळले
लग्न ठरण्याची एक दिवस बैठक सुरू झाली
लग्नाचा सर्व खर्च अर्धा-अर्धा सुपारी फुटली
तारीख लग्नाची दोन महिन्यांनी ठरली
तयारी सर्व झाली, काही चिंता नाही उरली
आनंदात हसताना ताई वेगळीच दिसायची
एकदम अचानक, शांत, एकटक पहायची
काय झालं? विचारलं की काही नाही म्हणायची
स्वानंद आणि घरचा दुरावा ही घालमेल कळायची
सुरुवातीला खूप ती आनंदी असायची
तारीख समीप येता घाबरलेली, दुःखी दिसायची
आई सारखी ताईकडे पाहत राहायची
घेऊन कुशीत पाणवलेल्या नयनांनी तोंडावर हात फिरवायची
तिला जे आवडतं ते सगळं बाबा घेऊन यायचे
पाणी घेऊन ये म्हणायचे आणि तिला पाहत राहायचे
आई-बाबांची अवस्था पाहून मलाही समजले
का म्हणायचे परक्या घरचे धन तिला मला उमगले
लग्नाचा दिवस उगवला सारी लगबग झाली
पाहुणे मंडळी सगे-सोयरे लग्न मंडपात आली
साखरपुड्यात एकमेकांनी बोटात घातली अंगठी
हळद लावून बांधल्या जन्माच्या रेशीमगाठी
मुहर्तावर थाटामाटात शुभविवाह संपन्न झाला
सर्व होम विधी गुरुजींनी येथोचित पूर्ण केला
निघाली ताई जेव्हा सासरला जायला
नाही वेळ मिळाला आई-बाबांकडे पाहायला
गडबडीत एकमेकांना ते शेवटी भेटले
डोळ्यातील अश्र डोळ्यात आटले
