सहल
सहल
आमच्या काळी वर्षातून एकदा
घेऊन जायची शाळा ट्रिप
आता सध्या शनिवार रविवार
आठवड्याला ट्रिपणे घेतलीये ग्रिप
ट्रीप म्हटलं की दोन-चार दिवस
आधीच असायची सर्वांची जय्यत तयारी
एक दिवसासाठी लाडू,भेळ चकल्या
सात वाजता उठणारे आम्ही उठायचो राम पहारी
एसटीत बसताना बाकावर
कोणाला घ्यायचं आपल्याबरोबर
हे ठरलेलेच गणित असायचं की
आपली ज्याच्याशी मैत्री आहे खरोखर
रात्र भर ट्रिपचेच स्वप्नं तरी
पहाटे घ्यायचो आम्ही आवरायला
पालक सोडवायला यायचे शाळेत
कडक शिस्तीचे शिक्षक आम्हांस सावरायला
गाडी पुढे नारळ फोडून
'गणपती बाप्पा मोरया' म्हणायचो
एसटी सुटताना खिडकीतून
पालकांना आनंदाने टाटा करायचो
दोन-तीन दिवस सांगितलेल्या
सूचना शिक्षक परत एकदा सांगायचे
विद्यार्थी कोणी चुकला की
क्षमा नाही अंगावर धाऊन यायचे
गावा बाहेर सर्वांसोबत
फिरायला खूप मज्जा यायची
निसर्गाचे सौंदर्य समोर असे
आम्हांस मिळे पर्वणी पाहायची
गडावर चढताना मावळ्यांचाच
विचार मनी अभिमान वाटायचा
स्वराज्यासाठी कित्येकांनी बलिदान दिले
या विचाराने कंठ दाटून यायचा
गडावरील वैभव पाहताना येई
डोळ्यासमोर इतिहास विरांचा
मुखातून आपसूक आवाज निघे
विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा
मग खाली येऊन दुपारचे जेवण
सगळेच एकत्र करायचो
त्यानंतर ठरल्याप्रमाणे आम्ही
साखर कारखाना पहायचो
शेवटी गाडी निघायची
आपल्या गावी आपल्या घराकडं
पालक सगळे शाळेत हजर
सगळे सुखरूप येऊ दे, देवास साकडं
अशी मजेशीर व्हायची शालेय सहल
यामधे मित्रांची अजूनच होई गट्टी
थकलेल्या मुलांसाठी शाळेला
मिळे दुसऱ्या दिवशी सुट्टी
एवढी वर्षे होऊन गेली तरी
अजूनही आठवते आमची सहल
आपल्या मुलांना आठवड्याला फिरवा
समाधान नाही, दाखवा समुद्र अथवा महल
