लाल
लाल
"महापुरुषांना डोक्यावर नाही,
डोक्यात घ्या"
हे शब्द सतत कानावर आदळतात.
पण आमच्या हातात दगड येतो अन् भिरकावला जातो...
व्हाटसअप ,फेसबुकवर सेलिब्रेशन वाढलयं,
प्रत्येक घटना साजरी करताना आम्ही व्हायरल करतोय फोटो सत्काराचे, आभाराचे अन् पेटत्या निखाऱ्याचे...
महापुरूषांच्या विचारांना तिलाजंली देत,
जयंती पुण्यतिथीला फ्लेक्स झळकतात चौका-चौकात...
सूर्य वाटून घ्यावा तुकडया-तुकड्यात तसे आम्ही महापुरूष वाटून घेतलेत जाती-जातीत,
ते आयुष्यभर सांगून गेलेत एक व्हा,
आम्ही एक नाही परंतु एकटे झालोत...
एकमेंकाच्या जीवावर उठताना
भिरकावला जातो एक दगड
पण भिरकावलेला प्रत्येक दगड एकच रंग घेऊन येतो
'लाल'
तरीसुद्धा आम्हांला कधीच प्रश्नाचे उत्तर मिळत नाही,
रंगाचे तुकडे केलेत हजार पण एका माणुसकीच्या रंगासाठी आम्ही का जगत नाहीत.