कविता म्हणजे
कविता म्हणजे
कविता म्हणजे नवजात बालकाचे बंद डोळ्यांसव गोंडस सुहास्य
झाकलेल्या मुठीमधील अस्पष्ट रेषांचे रहस्य
कविता म्हणजे उमलणाऱ्या कलिकांचे भान हरपणारे सौंदर्य
तिज जपणाऱ्या हातांचे चेहऱ्यामागील गांभीर्य
कविता म्हणजे कुमारकांचे सळसळणारे रक्त
आसुसलेल्या प्रेमाचे भाव कसे अव्यक्त?
कविता म्हणजे दोन जीवांच्या संदेशाचे प्रतिक
दुराव्यातील भेटीचे सुख असे आंतरिक
कविता म्हणजे निळ्याशार आभाळातून कोसळणारी श्रावणसर
सागर लाटांवर स्वार झालेली प्रेमी युगुलांची हळवी तर
कविता म्हणजे त्याच्या नी तिच्या संसाराचं गुपित
जपून ठेवलंय त्यांनी ते आठवणींच्या कुपीत
कविता म्हणजे अन्यायातून पेटून उठलेली विद्रोहाची मशाल
कुठे मूकपणे व्यक्त झालेले कारुण्य चक्षु विशाल
कविता म्हणजे शांत निश्चल देहावरची गुंडाळलेली श्वेत गाठ
जगून झालेल्या आयुष्याच्या एका समाप्तीचा अवघड पाठ
कविता म्हणजे पंचतत्वात विलीन झालेली रक्षा
पुन्हा नव्याने जन्मण्यासाठी ईश्वर देईल दिक्षा
