जुनाट
जुनाट
एक कहाणी जुनी पुराणी
जाती मध्ये इथे अडकली
रिवाज सारे जुने पुराणे
विरह वेदना इथेच डसली
जुनापुराणा नकोच रस्ता
नकोच अवखळ, अल्लड वाटा
कुणास ठावे तिथे विषारी
लपून बसला असेल काटा
रुतेल पायी गळेल अश्रू
दिसतील पुन्हा जुन्याच जखमा
रंध्रा रंध्रा मधून दबक्या
ढपली निघता सलेल जखमा
बसतील उगा घाव जिव्हारी
जिथे पेरल्या स्मृती अंगणी
गंध सुवासिक नसेल आता
कुसुम तळाशी नसे चांदणी
युगायुगांचे शापित वारे
काळ बनूनी अवती भवती
वसवसलेले पिंगा घाली
वणवा होई पुन्हा सभोती
जुनाट वारा जुना शहारा
नकोच काही जुन्याच बाता
नव्या दिशेची पहाट घेऊ
जात पेरणी नकोच आता
हवी कशाला मनास भीती
पुन्हा कशाला कुणास भ्यावे
जुनाट वळणा वळणावरती
मिळेल त्याला उत्तर द्यावे
