STORYMIRROR

Varsha Gaikwad

Others

3  

Varsha Gaikwad

Others

प्राक्तन

प्राक्तन

1 min
163

मदतीचा मी हात दिला पण, हाय... कितीदा छळले 

नातीगोती निव्वळ खोटी, ठेच लागता कळले

कुणास ठावे किती जन्मल्या भाग्योदयच्या रेषा

हाती आले म्हणता म्हणता सत्य पुन्हा का वळले 

जगण्या मरण्या मधले अंतर एक प्रवाही वारा

डोळ्यांमध्ये भरून उरल्या संथ नदीच्या धारा

श्वासामधली तान दीर्घशी घेताना अडखळले

हाती आले म्हणता म्हणता सत्य पुन्हा का वळले 

आयुष्याशी दोन हात मी करताना सरसवले

संकटातुनी मार्ग शोधता पुन्हा कशी भरकटले

शब्दतीर तो हृदयामध्ये घुसताना हळहळले

हाती आले म्हणता म्हणता सत्य पुन्हा का वळले 

ऋतू कोवळे चैत्र क्षणांचे नेत्र सुखाने न्हाती

ग्रीष्माच्या का तीव्र झळांनी उष्ण श्वापदे गाती 

मला कैकदा कवेत घेउन किती उन्हाळे जळले

हाती आले म्हणता म्हणता सत्य पुन्हा का वळले 

जगतामधले अनुरक्तमयी चराचरातुन दिसते

माझ्यामधल्या मला कितीदा सूर्यप्रभाही छळते

अस्सल नाणे खणखणीत मी कुणास नाही कळले

हाती आले म्हणता म्हणता सत्य पुन्हा का वळले

Rate this content
Log in