स्मृती
स्मृती
नभी सांज येता मनाला हवीशी
जरा रात्र डोळ्यात होते अधाशी
दिवे मालवूनी हवा मंद होते
उरे उष्ण श्वासात धुंदी जराशी
तुला मागताना नभाचे नजारे
फुले पाकळी पाकळी चंद्र तारे
मनोमंडपी विश्व रंगीत होते
प्रभाती पडे स्वप्न वेडे बिचारे
तुझा भास होताच येतो शहारा
मनाचा फुले मोरपंखी पिसारा
रुते खोल श्वासात गाणी स्मृतींची
खुळ्या आठवांचा सुगंधी पसारा
पुन्हा गंध घेवून आला युगांचा
पुन्हा व्याप सारा तुझ्या आठवांचा
पुन्हा दाट होतो दिठीच्या तळाशी
विनाकारणी मेघ ओल्या क्षणांचा
नको साद घालू नको ना पुकारू
जुन्या जाणिवांना नको ना स्विकारू
पुढे चाललो बंध तोडून सारे
नव्या आसमंतास गे अंगिकारू
