कविता कशाची होते
कविता कशाची होते
....कविता कशाची होते ...
कविता जगण्याची होते
तुला बघण्याची होते
मना मनातील साद प्रतिसादांची
अन् डोंगर कपारीत उगवलेल्या
हिरव्या,अंकुर चैतन्याचीही होते ,कविता...
उत्तर रात्रीच्या शांततेत
दरवाळणाऱ्या मंद गाण्याची होते
तळणाऱ्या उन्हात राबणाऱ्या हातांची अन्...
खळाळून वाहणाऱ्या पाण्याची होते कविता ।।
डोक्यावरचे ओझे अन्
घामात चिंब निथळत्या देहाची
पहिल्या पावसात विजा कडाडताना,
चिंब चिंब भिजण्याच्या मोहाची
होते कविता...!
कविता होते
आठवणींच्या सायीची
वासरासाठी हंबरणाऱ्या गायीची
माणसाच्या काळजाला दु:खाचा
पिळ पाडणाऱ्या मनराईची
मनात घर करून बसलेल्यांची
असलेल्यांची अन् नसलेल्यांचीही
आयुष्यात ओवलेल्या गोवलेल्या
अतूट माणसांची...सावल्यांचीही
कविताच होते..
कविता जगण्याची होते
तुला बघण्याची होते...
आपण सारे सुखाच्या
मुक्कामाला येऊनही
नवनव्या वाटा पाहून
का ....?
पायांना घाई निघण्याची होते
कविता जगण्याची होते
तुला बघण्याची होते...!