कोटीशा आदित्य गोठे एके ठायी
कोटीशा आदित्य गोठे एके ठायी
कोटीशा आदित्य गोठे एके ठायी ।
तेजें दिशा दाही उजळल्या ॥१॥
घाबरा होवोनी वसुदेव पाहे ।
हृदयीं आश्र्चर्य करीतसे ॥२॥
मुकुटावरी रत्नें नक्षत्रांचा मेळा ।
भाळीं शोभे टिळा केशराचा ॥३॥
व्यंकटा भृकुटी कमळाकार नेत्र ।
नासीक विचित्र शुकचंचु ॥४॥
विद्युल्लते ऐसीं झळकती कुंडले ।
अधर कोंवळे अरुणादेव ॥५॥
कंबुग्रीव कंठ हृदयी वत्सलांछन ।
ब्रह्मयासी शीण न कळे अंत ॥६॥
चतुर्भुज शंखचक्रगदापद्म ।
चिमणा मेघ:श्याम वर्ण ज्याचा ॥७॥
कौस्तुभ निर्मळ वैजयंती माळा ।
कासे सोनसळा हाटकवर्ण ॥८॥
रुणझुण रुणझुण वाजताती जैशी रातोपलें ।
नामा म्हणे वाळे ॥९॥
आरक्त वर्तुळ नखीं शोभा ।
नामा म्हणे डोळे दिपताती ॥१०॥
