कोण म्हणतो माणूस माणसात आहे?
कोण म्हणतो माणूस माणसात आहे?
माणुसकीची लक्तरे टांगून वेशीला,
नीतीचा गळा घोटून दिले फासावर तीला,
सत्कर्माची चाड नाही राहीली जगाला,
दिखाव्याचा बाजार बहु इथे माजला,
जगणे इथे सुन्न एक हुंकार आहे,
कोण म्हणतो माणूस माणसात आहे?
अहंकाराने तोडली नात्यांची सावली,
शब्दाची किंमत मातीमोल ठरवली,
धनाच्या लालसेने वाट विवेकाची संपली,
करुणेची जागा आता कुकर्माने घेतली,
स्वाभिमान इथे जीव सोडत आहे
कोण म्हणतो माणूस माणसात आहे?
संपवली पापाने संस्कार शिदोरी,
विद्येची सर्व जाण पुस्तकात विरली,
कोणाची कोणाला किंमत ना उरली?
मन उचलतेय अमाप पापाची गाठोडी,
सद्विचारांचा इथे दारुण अंत आहे,
कोण म्हणतो माणूस माणसात आहे?
ज्ञानाविना संपूर्ण जीवन घालविले व्यर्थ,
दिखावु पणाने कसा साधेल परमार्थ?
काही प्रश्न मनाला विचाराल सार्थ,
मिळेल एक प्रकाशवाट त्यातून चिंतनार्थ,
तु तुझाच शिल्पकार हे जाणून पाहे,
कोण म्हणतो माणूस माणसात आहे ?
