मी शिक्षक बोलतो आहे
मी शिक्षक बोलतो आहे
अपेक्षांच्या ओझ्याचा
मी भार पेलतो आहे
ऐका कुणीतरी ऐका
मी शिक्षक बोलतो आहे ॥धृ॥
नवी उमेद, नवा उत्साह,
नवी कार्यप्रेरणा
अशा समाज सेवेची
मी सुरुवात करतो आहे
ऐका कुणीतरी ऐका
मी शिक्षक बोलतो आहे ॥१॥
स्वप्न मनात सुंदर ,
आदर्श, सुंदर अशी असेल शाळा
सर्व स्वप्नांचा हिरमोड
मित्रानो पहिल्या दिवशीच झाला
हातात झाडू घेऊन
शाळा परिसर स्वच्छ केला
रुपडे पालटावे शाळेचे
म्हणून झगडतो आहे ॥२॥
हसरी, बोलकी, तेजोवीत
आपली हि भावी पिढी
हिणवीत असे शिकवा आम्हाला
एकाच गलका करी
आज नाही उद्या बाळानो
असे रोज ढकलतो आहे
काय सांगू त्यांना कागदात
मी पुरता बुडलो आहे ॥३॥
दुपार होता आठवण येई
स्वयंपाकी असल्याची
आवाज दिला मुलांना
वेळ मध्यान्ह भोजनाची
शिजला कि नाही तांदूळ
वेळ चव पाहण्याची
हातात भांडी घेऊन
मुलांना वाढतो आहे ॥४॥
विडा उचलला शासनाने
आम्हा आधुनिक करण्याचा
झालो वेडे आता
डाटा किती किती भरायचा
सरल,शालार्थ,शिष्यवृत्ती
सर्व ऑनलाईन करायचा
क्याफे वाल्यांच्या आता मी
हाता पाया पडतो आहे ॥५॥
खेळ खंडोबा झाला
मुलांचा अन आमचा
खुर्चीत बसून आदेश काढतात
कायदा यांच्या घराचा
एकदाच काय ते करा
निकाल लावा कायमचा
व्यथा किती किती सांगू
जीव जळतो आहे ॥६॥
राहू द्या सर्व बाजूला
एकच तुम्ही करा
शाळा म्हणजे शिक्षक विद्यार्थी
हाच आदर्श पाळा
इतर कामे तुमच्या सोयीने
तुम्ही बिनधास्त करा
समजून विनंती एवढी
शिक्षणाचे दान मागतो आहे ॥७॥
ऐका कुणीतरी ऐका
मी शिक्षक बोलतो आहे ॥
