कल्पनेचा झुला
कल्पनेचा झुला
कल्पनेचा उंच झुला, जोडू वास्तवाशी
संसारात लाभतील गोड सौख्य राशी ।।धृ।।
संसाराला सजवाया, स्वप्न मोठे पाहू
साध्य करावयासाठी, सदा जागे राहू
दोघांनी मिळून देऊ, लढा वादळाशी ।।
संसारात लाभतील, गोड सौख्य राशी ।।१।।
सुख दुःखे, संकटांनी, जीवन भरले
कल्पनेच्या झुल्यामुळे, संकट सरले
उंच नेऊ आनंदाचा, झोपाळा आकाशी ।।
संसारात लाभतील, गोड सौख्याच्या राशी।।२।।
गोंडस गोजिरी फुले, येतील वेलीला
अंगणात चालतील, त्यांच्या बाळ लीला
आट्या पाट्या खेळ खेळू, दोघेही त्यांच्याशी ।।
संसारात लाभतील, गोड सौख्याच्या राशी ।।३।।
कल्पनेचा झुला त्याला, दोर कल्पनेचा
मायेच्या पंखाने रोखू, वारा वेदनेचा
घालू स्वप्नांची सांगड, वास्तव जगाशी ।।
संसारात लाभतील, गोड सौख्याच्या राशी ।।४।।
