काजवा
काजवा
उगाच भटकत हिंडत राही
एक काजवा स्वयंप्रकाशी,
काय करतसे कुणा न कळे
या झाडाहून त्या झाडाशी.
अंधारातच मिरवी स्वतःला
दिवसा कुठे राहतो दडून,
उजेडाची जणू भीती याला
कुठल्या बिळात राहतो पडून.
याचा फक्त असे दिखावा
कवडीचा ना उपयोग जगाशी.
एक सुगरण भारी लबाड
काजव्याची ती करी स्तुती,
चल म्हणे घरट्यात माझ्या
करीन तुजवर मी प्रीती.
गर्वाने तो फुगला कीडा
भुलला खोट्या वचनाशी.
रात झाली घरटा उजळला
काजव्याच्या त्या उजेडाने,
दिवस होताच प्रकाश लुप्त
काजवा बने एक खेळणे.
बंदीगृहात खितपत पडला
उगाच बिचारा मरे उपाशी.
