STORYMIRROR

UMA PATIL

Inspirational Others

4  

UMA PATIL

Inspirational Others

जिजाऊंचा जयजयकार

जिजाऊंचा जयजयकार

1 min
402



करतो तुझा जयजयकार

जय जय जिजाबाई

थोर तुझी गं पुण्याई

तू शिवबाची आई.... ।।१।।



लखूजी जाधवांच्या घराण्यात

श्रीमंतीत जिजाबाई जन्मली

शहाजी राजाशी सोयरीक

जुळवून लग्नगाठ बांधली... ।।२।।



१६३० या वर्षामध्ये

१९ फेब्रुवारीच्या रोजी

तुझ्या पोटी पुत्र जन्मला

नाव ठेवले त्याचे शिवाजी... ।।३।।



उपकार तुझे जिजाऊ अनंत

लाल महालाची केलीस निर्मिती

तुझ्या डोळ्यांत दिसे नेहमी

सुव्यवस्थित स्वराज्याची आकृती... ।।४।।



शिवबाला सांगितल्या नेहमी

तू थोर पराक्रमाच्या कथा

त्यामुळे घडला वीर शिवाजी

तुझ्या चरणी टेकवतो माथा... ।।५।।



जिजाऊ बलाढ्य सिंहीण

शिवबा तुझा छावा

संकटकाली आठवते तू

करतो आम्ही तुझा धावा... ।।६।।



धन्य तो तुझा शिवबा

तुझी नेहमी मानायचा आज्ञा

रायरेश्वराच्या मंदिरात केली

स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा... ।।७।।



तोरणा जिंकून शिवरायाने

तोरण बांधले स्वराज्याचे

बघितले स्वप्न नेहमी तू

मराठ्यांच्या प्रभावी साम्राज्याचे... ।।८।।



अफजलखानाचा करूनी वध

शायिस्तेखानाची छाटूनी बोटे

आमचा राजा आहे शिवराय

म्हणुनी आमचे भाग्य मोठे... ।।९।।



वीर शिवाजी झाला राजा

शिवाजीचा राज्यभिषेक सोहळा

पाहिला जिजाऊ मातेने

याचि देही, याचि डोळा... ।।१०।।



देह त्यागुनी जरी निघाली

किर्ती दरवळते आसमंतात

तुझी थोरवी गातो आम्ही

सदैव आहेस तू स्मरणात... ।।११।।



जिजाऊ थोर तुझी किर्ती

तू होतीस महान आई

निरंतर गातो तुझे गोडवे

अनंत आहे तुझी पुण्याई... ।।१२।।





Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational