जीवन प्रवास
जीवन प्रवास
मी देखील चालतच होते इतरांप्रमाणेच
वेगवान ही झालेले अगदी ओघानेच
त्यातच मिळत राहीली कौतुकाची थाप
उत्साहात बागडले सोबत मैत्रिणींची साथ
वाट अशीच मजेशीर आहे असे वाटू लागले
पण रस्ते वेगळे झाले तेव्हा एकटे वाटू लागले
गती जरा मंदावली पण चालणे भाग होतेच
धडपडत का होईना अंतर कापत मी होतेच
नवी दिशा, नवी आशा, रूंदावलेल्या नव्या वाटा
स्पर्धेमध्ये सामिल होण्यास मी ही केला आटापिटा
वेगवेगळी वळणे आली, कधी दमछाक ही झाली
अनुभवांची शिदोरी घेऊन घोडदौड सुरूच राहीली
घेतला हाती हात आयुष्यभराची साथ देण्यास
रोमांचित होऊ लागला सोबतीचा आमचा प्रवास
मग घेतला जरा विसावा बाजूला सारून सारया स्वप्नांना
बोट धरून चालायला शिकवले नवीन छोट्या पावलांना
पण जुनी वाट खुणावत राहते स्वप्ने समोर तरंगू लागतात
भरधाव वेगाने जाणाऱ्याकडे डोळे नुसतेच पाहत राहतात
अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी सारच अंधूक दिसू लागलय
उडी मारून गाठावा वाटतोय पल्ला पायात पंखांच बळ जे संचारलय