ओसरत्या भावना
ओसरत्या भावना
झाली सुर्यास्ताची वेळ
आकाशी रंगांचा तो मेळ
जणू मिसळल्या भावना
अशा छटा त्या रंगांना
अवचित एखादा उसासा
आपटी खडकांवरी लाटा
घालण्या फुंकर जरासा
वारा करी आटापिटा
ओल्या वाळूत चालताना
उमटल्या पाऊलखुणा
ठाव लागता लहरींना
समेटती त्या क्षणांना
ओसरावे बांध भावनांचे
तसे परतणे त्या लाटांचे
कुजबुज तरीही सतत
किर्र रातकिडे ही सोबत