कविता
कविता
कसं समजतं तिला की व्यक्त व्हायचय मला
न साद घालताच येते ती कविता साथ द्यायला
काहितरी घडतं, तर कधी काही बिनसतं
चूक बरोबरच्या गणितात मन हरवून बसतं
मग येतात शब्द धावून मनातल्या भावना हेरायला
यमक ही जुळून येते मग कवितेला रूप द्यायला
मी माझ्या विचारांत किती गोंधळून गेलेली असते
कवितेतली ओळ मात्र मलाच सगळं सोपं करून सांगते
मी हि उलगडत जाते मग अगदी माझ्याच नकळत
इतके मोकळे वाटते तेव्हा मैत्रिणीशी बोलल्यागत
कितीही त्रासदायक प्रसंग जेव्हा कवितेमध्ये उतरतो
तिच्या रूपात तो अचानक सुंदरच भासू लागतो
अनुभवांकडे सकारात्मक रित्या बघणे हे कवितेने मला शिकवले
मला वाटले मी कवितेला रचले पण खरतर तिनेच मला घडवले