झाड शोधे सावलीला
झाड शोधे सावलीला
तेज प्रखर रवीचे
सोसे वृक्ष जन्मभरी
देतो सर्वांना सावली
झळ सोसूनी अंतरी
नाही कधीच विसावा
धरी ना कुणी सावली
तप्त झळा सोसूनिया
देई थंडशी सावली
येई जाई रविराज
त्यास नसे भीडभाड
आग ओकी मनमानी
वृक्ष उभाचि अखंड
बसे पांथस्थ थकला
दुवा देतसे वृक्षाला
तृप्त होई सावलीने
जीव थकला भागला
झाड शोधे सावलीला
कधी मिळेल सावली?
झाड म्हणते मनाशी
कशी मी झळ सोसली?
" वर बघ वृक्षराजा "
रविराज बोले त्याला
" अखंडचि तप्तरस
जन्म त्यासाठी आपला "