हल्ला
हल्ला
शत्रूनं केला होता आमच्यावर अचानक हल्ला
त्यांच्याच कुणीतरी दिला होता असा विघातक सल्ला
प्रत्येकाच्या हातात होती एकेक मशिनगन
सीमेवर तैनात होतो तयारीत आम्हीपण
आणखी सतर्क झालो आम्ही सुरु झाला जेव्हा गोळीबार
कुणी गोळ्या नि बाॅम्ब फेकत होता, कुणी करत होता शत्रूवर सपासप वार
छावणी उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने आले होते पन्नास जण
त्यांना नव्हतं माहित सीमेच्या खूपच अलीकडे होणार होतं आमचं रण
आम्ही घेतला टेकडीचा आधार लपून हल्ला करायला
मातृभूमीसाठी आमच्यातला प्रत्येकजण तयारीत होता मरायला
ठरलं आमचं मी जाणार पुढच्या पाॅइंटपर्यंत करत गोळ्यांचा भडिमार
बाकीचे देतील मला कव्हर शत्रूला करु आपण लवकरच ठार
मी निघालो गोळ्या झाडत माझ्या जागेवरुन
शेवटचं एकदा माझ्या मातृभूमीला स्मरून
काही कळायच्या आत एक मोठा स्फोट झाला
शत्रूनं डागली होती तोफ टेकडीवर दरडीखाली माझा सगळा कँप गेला
मी सावरेपर्यंत कपाळाला एक गोळी गेली चाटून
क्षणभर थबकला समोर येऊन मृत्यू असंच गेलं वाटून
शुद्धीवर आल्यावर समजलं आमची झाली होती सर
सैन्य आणि वैद्यकीय सुविधा पोहोचली होती वेळेवर
अभिमान, दुःख, अश्रू, आनंद, सगळं काही होतं बरोबर
साथीदार नसल्याचं शल्य सतावत होतं क्षणाक्षणाला खरोखर
सलाम त्या वीरांना ज्यांनी दिले मातृभूमीसाठी प्राण
आजन्म देशसेवा हेच आमचं जीवन, ब्रीदवाक्य माझा देश महान