गणू
गणू
गणूची आई आज खूप काळजीत दिसतेय
थोडी नर्वस म्हणा हवं तर
कारणही तसंच तर आहे
काळजाच्या तुकड्याला
क्षणभर विलग न होऊ देणारी आई
लेकराला भरल्या अंतःकरणाने निरोप देत
जेंव्हा म्हणते, 'बाळ सांभाळून जा हो'
आणि लवकर परत येशील
तुझ्याशिवाय करमत नाही रे क्षणभर
आपल्याही काळजाला घर पडतं....
ते पलिकडे काहीतरी विनोदीच चाललंय
अहो गणूच्या बायका त्या.
बघा कशा नाक मुरडताहेत...
पण गणूही मोठ्ठा हुशार हो
नजरेचा तिरका कटाक्ष टाकून
नजरेनेच बाय करतोय गडी
गणू त्याच्या मम्मीची समजूत काढतोय...
हो मम्मीच !
आपल्या सोबत राहतो ना दहा दिवस
मग त्याच्याही अंगवळणी पडणारंच की, असो.
आपल्या उपरण्यानं आईचे डोळे पुसत
गणू आईला म्हणतोय...
काळजी नको करूस गं
बघ मलाही रडवेलं होतं नाहीतर
तुला तर ठाऊकच आहे....
तिकडे कितीजण वाट पाहताहेत माझ्या येण्याची
त्यांची आशा मी नाही मोडू शकत ना गं
येईल हो दहा दिवसांनी परत
तू येशील ना मला घ्यायला...
त्या थंडगार पाण्याने कापरं भरतं मला
पण त्या पाण्यातून अलगद तुझ्या कुशीत शिरताना
तुझ्या मायेची ऊब मिळते
आणि कापरं कुठच्या कुठं विरतं बघ
बरं ते असू दे, निघतोय मी आता
वेळेवर पोहोचायचंय ना मला
हा बावळट मुषक कुठं राहिलाय कुणास ठाऊक
गणूने आईचा आशिर्वाद घेतलाय,
बापाच्याही पाया पडून झालंय
स्वारी निघालीय प्रस्थानाला....
मी तर बुवा पहातोय वाट आतुरतेने त्याच्या येण्याची
तुम्हीही पाहताय ना ...............
