विझण्याआधी
विझण्याआधी
ओंजळीतील वाळू,
हळूहळू घरंगळत आहे.....
जमीनीशी तिचे खरे सख्य आहे म्हणून !.....
आपण मात्र बेफिकीर,
बेसावध, बिनधास्त....
अजूनही,
ओंजळ भरलेली असण्याच्या नादात !
रित्या होत चाललेल्या कणांकडे,
आयुष्याच्या क्षणांकडे,
खरंतर आपलं कधी लक्षच नसतं.
आपण फक्त धावत राहतो,
आयुष्य नावाच्या आकाशात,
अपेक्षारुपी म्हातारीच्या
मोहक तंतूकोषांमागे.
अचानक, एक दिवस, लक्षात येतं.....
ओंजळीतील कण, आयुष्यातील क्षण,
सरत आल्याचं.....
तेव्हा मात्र निघून गेलेली असते वेळ,
स्वत:ला सावरण्याची.
म्हणून, पश्चात्तापाच्या वणव्यात जळून,
सर्वस्वाची राख होण्याआधी,
मना... तू सावध हो !
ही आग जळून विझण्याआधी,
कणा-कणातून घरंगळणाऱ्या
त्या चैतन्याचा, तू शोध घे!
जळण्याची ही परंपरा टाळण्यासाठी !.....
