रंगी रंगला श्रीरंग
रंगी रंगला श्रीरंग
सावळ्याची राधाराणी
नभी उधळीते रंग
वृंदावनी, त्या रंगाच्या
रंगी रंगला श्रीरंग
निळ्या अंगी शोभिवंत
दिसतात बहुरंग
रंग पाहून हरीचे
झाले त्रिभुवन दंग
धाव धावतो श्रीहरी
किती चोरतो अंग
मागे धावते श्रीराधा
रंगविते नवरंग
गोप, गोपी, राधा-कृष्ण
सवे रंगाचा व्यासंग
होलिकेच्या खेळातला
हरी शोभतो सारंग
कवी स्वगत मांडतो
धर लेखणीचा संग
शब्दातून रंगविण्या
कवितेचे अंतरंग

