STORYMIRROR

Jayashree Kelkar

Inspirational

3  

Jayashree Kelkar

Inspirational

गंध अनुबंधाचा

गंध अनुबंधाचा

1 min
200

शैशवं आणि वार्धक्य

दोन्ही नांदतयं माझ्या घरी...

धूप,अमृतांजनचा मिश्र गंध

भरून राहिलाय उरी !


स्पर्शाचा गंध छोटू अन

आबांना भासतो आगळावेगळा...

त्यांच्या आविर्भावात दिसतो

प्रेमगंध अन जिव्हाळा !


स्मितहास्य मुखी विलसते

जणू चांदण्यांची बरसात...

चैतन्याचा गंध फुलतो

दोघांच्याही बोळक्यात !


छोटूचे भरघोस जावळ,

तर आबांचे डोक्यावरचे बेट...

दोघांच्याही न्हाऊ माखू

नंतर तेलाचा गंध शिरतो नाकात थेट !


इवल्याश्या दुपट्यात काढते

छोटूची गंधित फुलांनी दृष्ट...

सुगंधी पावडर लावली तरी

चिडचिडत आबा होतात उगाचंच रुष्ट !


ऊनं ऊनं खिचडीवर

लोणकढं साजूक तूप...

सुवासिक गंधाने जीभ चाळवून

दोघांनाही येतो हुरूप !


बोबड्या बोलांनी,

लाळ भरल्या मुखानी लाडिक हट्ट छोटूचा...  

जिद्दीने उपभोगतायत

आबा संधिकालातील गंध उन्हाचा !


छोटूच्या हास्यविलोभाने

गंधाळतो खुशीचा बहर...

कधी तृप्ती अन क्षणात

विरक्ती दाखवतात आबा अष्टोप्रहर !

 

निरागस प्रेम, गंधमय स्मित

असे छोटूचे बालपण..

वार्धक्याच्या दुलईने उबदार होते

तान्हुकल्याचे कोवळेपण !


अतर्क्य,अशक्य ला नाही थारा,

गंधित मोहोर उन्मादाचा...

शैशव,वार्धक्य चालती सोबतीने ,

त्रास न वाटे अनुबंधाचा !

त्रास न वाटे अनुबंधाचा !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational