एक वादळ उरातील
एक वादळ उरातील


एक वादळ उरातील शांत करून गेलीस तू.
थिजलेल्या आसवांना वाट दावून गेलीस तू.
बेफाम या सागरावर लाटा भरतीच्या उठल्या
हरेक लाट धीराने मागे सारून गेलीस तू.
या जुलुमी जगाने हृदयास बेजार फार केले
संगीन नजर जगावर रोखून गेलीस तू.
मी चाललो तुडवीत हा रस्ता काट्यांनी भरलेला
केतकीची फुले मार्गावर उधळून गेलीस तू.
अंधार दाटला मनी भवितव्यही अंध:कारले
दीपस्तंभ आशेचा सखे होऊन गेलीस तू.
हा उगाच शब्दपसारा अर्थाविना जाहला व्यर्थ
सौंदर्य शब्दात माझिया पेरून गेलीस तू.