दुरावली स्वप्ने
दुरावली स्वप्ने
ती आणि तो दररोज संध्याकाळी भेटायचे
मिळून दोघे छोट्याशा घरकूलाचे स्वप्न पहायचे
दोघांनी ते स्वप्न प्रत्यक्षातही आणले
लग्नानंतर त्यांचे प्रेम बहरतच गेले
लवकरच त्यांच्या घराचे गोकुळ झाले
ईवल्याशा पावलांनी कन्यारत्नाचे आगमन झाले
त्यांच्या छोट्याशा विश्वात तो, ती आणि त्यांची छोटुकली
सुखी संसाराची जणु सापडली त्यांना किल्ली
पण अचानक त्या दोघांमध्ये काहितरी बिनसले
दोघांचे जुळलेले सूर आता बेसूर होऊ लागले
असह्य झाले त्यांना आता एकत्र राहणे
निर्णय घेतला दोघांनी एकमेकांपासून दूर जाणे
दोघे एकमेकांना घातलेली अंगठी तर परत करतील
पण दोघांनी बघितलेल्या स्वप्नांचे आणि आठवणींचे काय करतील?
दोघे कदाचित चालूही लागतील आपापली वेगळी वाट
पण त्या लहानग्या छकुलीला पकडता येतील का एकत्र दोघांचे कधी हात?