दस्तक इवल्या पावलांची
दस्तक इवल्या पावलांची


इवल्या इवल्या पावलांनी
दस्तक दिली जीवनात
आले भरूनी मला
पाहून इवलेसे ते हात
घरात आता येतो वास
दुपट्या अन् बेबी पावडरचा
येईना सर त्या वासाची
फुले अन् अत्तराला
भावे मनाला माझ्या तुझे
खळखळून हसणे
साद ऐकूनी तुझी
होई प्रफुल्लित मन माझे
घरभर असतो पसारा
खेळणी आणि कपड्यांचा
वाट काढत रांगत असतो
आमचा राजदुलारा
चपलांशेजारी लागू लागल्या
छोटया छोटया चपला
इवला हट्ट होऊ लागला
मोठ्या चप्पल घालण्याचा
घरात
येऊ लागले
पेन स्केचपेन, खेळणी
वरण भाताच्या जागी आता
आले जाम अन् मॅगी
पर्स शेजारी माझ्या आता
विसावू लागले दप्तर
दमछाक होते माझी
शोधून पसाऱ्यात पेन्सिल, रबर
असते दिवसभर कार्टून
चालू त्या टिव्हीवर
युट्युबचे किड्स सॉंन्ग नोटिफिकेशन
झळकत राहते मोबाईलवर
नकाे ते खेळ लगोरी
पळापळी अन् लपंडाव
फक्त तुम्ही करून द्या
मोबाईल तुमचा अनलॉक
प्रेम आमचे वाढत आहे
दिवस आता कमी पडत आहे
वाढत असला खर्च तरी
घर मात्र आनंदी होत आहे